नवक्रांतीचे अग्रदूत: रणजितसिंह डीसले
जागतिकीकरणाच्या युगात ओस पडू लागलेल्या मराठी शाळा, पालक वर्गाचा मराठी शाळा व मराठी माध्यमातून देण्यात येणारे शिक्षण याकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे धनदांडग्यांच्या इंग्रजी शाळांचे वाढते महत्त्व या सार्या बाबींचा विचार केला असता, महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेचे प्रयोगशील शिक्षक रणजितसिंह डीसले यांना नुकताच ग्लोबल टीचर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा नवक्रांती च्या आरंभाचा सुवर्ण क्षण म्हणावा लागेल. सरकारी शाळेतील शिक्षकाचा जागतिक सन्मान यातून व्यवस्था परिवर्तनाचा नवा अध्याय निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मराठी शाळांचे शिक्षक व पालक यांच्यात नवचेतना निर्माण होईल व भविष्यात मराठी शाळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल असा सार्थ विश्वास वाटतोय.आपल्या पाल्याने केवळ इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यावे हा अट्टाहास त्याला कारणीभूत अधिकाधिक सुविधांचे प्रलोभन, इंग्रजीचा प्रभाव, दिखाऊपणा ची उच्च परंतु बेगडी शिक्षणप्रणाली हे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रस्थ यास जबाबदार घटक मानता येतील. मराठी शाळा टिकविण्याचे आव्हान व जबाबदारी आहे ते म्हणजे पालक, शिक्षक, आणि शासन यांच्यावर. जागतिक स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी 'सक्षम माणूस निर्मितीचा कारखाना' म्हणजे खाजगी शाळा असा समज बहुदा समाजात रूढ झालेला दिसतोय. याच कारणांनी पालकांनी मराठी शाळांकडे पाठ फिरवलेली दिसते.
नेहमी जिल्हा परिषद शाळा व मराठी माध्यमातून दिले जाणारे शिक्षण यावर बोंब मारणाऱ्यांना रणजीतसिंह डीसले यांना मिळालेल्या जागतिक पुरस्काराच्या स्वरूपात जबरदस्त प्रत्युत्तर मिळाले आहे. आजही काही मराठी शाळांचे प्रवेश मेरिट लिस्ट च्या आधारे होत आहे हे शक्य होण्याचे कारण काही निवडक, प्रयोगशील,कल्पक, नवोपक्रमी शिक्षकांचे योगदान.आजही अनेक मराठी शाळांमध्ये अभिनव व नावीन्यपूर्ण पद्धतीने अध्यापन कार्य करणारे शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना प्रभावी अध्यापन करणे ग्रामीण भागातील शिक्षकांना अवघड आहे हे मानायला पाहिजे त्या तुलनेत शहरातील शिक्षक व विद्यार्थी हे विविध बाबतीत सरस ठरतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवितांना शहरी भागातील विद्यार्थ्यांशी प्रतिस्पर्धा करील इतका सक्षम बनविताना शिक्षकांना अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. अपुऱ्या सोयीसुविधा, प्रशिक्षणाचा अभाव, तंत्रज्ञान वापराचे अपुरे कौशल्य, शैक्षणिक उपक्रमांची वानवा इत्यादी कारनांमुळे शैक्षणिक मागासलेपण जाणवतो. मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात येण्यासाठी शासनाची उदासीनता ही तितकीच जबाबदार आहे. शासनाने शिक्षण क्षेत्रातल्या कल्पनांना वाव देण्यासाठी आर्थिक गुंतवणूक करणे फार गरजेचे आहे तेव्हा गुणवत्तापूर्ण शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळा द्वारे दिल्या जाईल व पुन्हा एकदा मराठी शाळांना पूर्वीचे वैभव प्राप्त होईल
ग्रामीण भागातील मराठी शाळांचे प्रश्न गंभीर असून सुद्धा अशाच एका छोट्या खेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत अध्यापनाचे कार्य करणाऱ्या रणजीतसिंह डीसले यांना ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली याबद्दल, मुलींची शाळेतून गळती थांबवण्यासाठी, बालविवाह रोखला याबद्दल ग्लोबल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लंडनमध्ये एका ऑनलाईन समारोहात त्यांच्या निवडीची घोषणा हॉलिवूडचे अभिनेते स्टीफन फ्राई यांनी केली व त्यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. कारण पहिल्यांदाच एखाद्या भारतीय शिक्षकाला हा पुरस्कार मिळाला या पुरस्काराची सुरुवात 2014 सालि झाली. युनिक फाउंडेशन द्वारा दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारामध्ये सात करोड करोड रुपये दिले जातात. जगातील 140 देशांच्या 12000 शिक्षकांमधून रणजीत सिंह यांची निवड झाली निश्चितच सर्व भारतीयांसाठी गर्वाची बाब आहे. डीसले हे एक कल्पक, प्रयोगशील, कृतिशील व नवनव्या पद्धती ने अध्यापन कार्य करणारे शिक्षक म्हणून परिचित आहेत. याआधी युनेस्कोनेही त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते तब्बल 83 देशांच्या मुलांसाठी विज्ञानाचे ऑनलाइन क्लासेस घेत आहेत. ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम या कार्यक्रमात त्यांना ग्लोबल टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जगातील सर्वोत्तम शिक्षकांमध्ये एका भारतीय व जिल्हा परिषदेत अध्यापन करणाऱ्या शिक्षकास सर्वोच्च स्थान मिळाले ही खरच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. रणजितसिंह डिसले यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नव्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली व ज्ञानाचे भांडार उघडे करून दिले. गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चमचमीत महागड्या शाळांत दिले जाणारे शिक्षण दिले. जागतिक स्तरावरील सोयी सुविधा असलेल्या कोणत्याही इंग्रजी माध्यमाच्या इंटरनेशनल शाळेच्या शिक्षकांना करता आले नाही अशी कामगिरी छोट्याशा खेड्यात अध्यापन कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकाने करून नवा आदर्श निर्माण केला याचा सर्वांनाच निश्चितच अभिमान वाटतो. जगातील तंत्रज्ञानाने स्वयंपूर्ण अशा इटली, ब्राझील, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, अमेरिका व ब्रिटनच्या प्रतिस्पर्धी शिक्षकांना मागे सारून डिसले यांनी हा बहुमान मिळवला. त्यांनी QR Code (Quick Response Code) चा अध्यापन कार्यात सर्वप्रथम वापर करण्यास सुरुवात केली. त्यांनी पाठ व कविता शिकविण्याचे कार्य त्याद्वारे केले. त्यांच्या कल्पकतेची दखल 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारने घेत व आता NCERT ने संपूर्ण अभ्यासक्रम QR Code च्या माध्यमातून जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतातील केवळ 24 टक्के कुटुंबाकडे स्मार्टफोन असून 5 ते 11 वयोगटातील मुले असलेल्या 11.5 टक्के घरांमध्ये कंप्यूटर व इंटरनेट सेवा उपलब्ध आहेत त्यातही या आकडेवारीत ग्रामीण भागाचे प्रमाण कमी आहे.अश्या परिस्थितीत डिसले यांनी किमया करून दाखविली.आजचा शिक्षक वर्ग पारंपारिक अध्यापन पद्धतीला छेद देत नव्याच्या पुरस्कार करताना दिसतोय. विविध अध्यापन पद्धती व नवनवीन संसाधनाचा वापर वापर केला जात आहे. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून अध्यापन कार्य अधिकाधिक प्रभावी पद्धतीने करण्यात येत आहे.विसाव्या शतकातील शिक्षकांच्या भूमिकेमध्ये मोठा बदल पाहावयास मिळतो. ग्रामीण भागातील विशेषत: मराठी शाळेतील शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थी हिताच्या नवनव्या पद्धती विकसित करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. संशोधनाचा व तंत्रज्ञानाचा योग्य मेळ घालून शैक्षणिक क्रांती घडवून आणावी लागेल. सरकारनेही मराठी शाळेतील शिक्षकांना निवडणुका, सर्वे तत्सम अशैक्षणिक कार्यातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ढासळत्या शिक्षण प्रणाली ला गतवैभव प्राप्त होईल असे कार्य पालक, शिक्षक व सरकार यांच्या सहभागातून शक्य आहे.
प्रा. अतुल दुर्गे
एस.चंद्रा महिला महाविद्यालय
साकोली जिल्हा- भंडारा
भ्रमणध्वनी ७८७५२७५८४६
Comments
Post a Comment